खुदही को कर बुलंद इतना, के खुदा खुद बंदेसे पुछे, की बता तेरी रजा क्या है!
हा संदेश आजच्या तरुणांना देणारी काही व्यक्तिमत्तव आपल्या भोवताली असतात. आपले नशीब आपणच घडवू शकतो, हेच ते सुचवत असतात. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार, हा संदेश देणारे आपल्या जवळचे व्यक्तिमत्त्व म्हणजे चित्रलेखा पाटील.
घर घर की कहानीमध्ये अडकून आपले अस्तित्व संकुचित करुन घेणारी महिलांची एक पिढी आपण पाहिली आहे. आधुनिकीकरणात महिलांची नवी पिढी मात्र क्षितीजावर उगवताना दिसते. आधुनिक जगताने दिलेली संधी कवेत घेताना प्रचंड महत्त्वाकांक्षा, प्रगल्भ समज, जबाबदारीचे भान आणि डोळ्यांसमोर उद्दिष्ट घेऊन आत्मविश्वासाने वाटचाल करणारी ही पिढी आहे. या पिढीला आरक्षणाच्या कुबड्या नकोत, महिला म्हणून विशेष सहानुभूतीही नको किंवा सहानुभूतीतून मिळणारी संधीही नको. ही पिढी स्वतःवर विश्वास ठेवून वाटचाल करते आहे. घराबाहेर पडताना येणारी आव्हाने पेलण्याची मानसिक ताकद या पिढीत उपजतच आहे. त्यामुळे आम्ही संधी मिळवू आणि त्याचे सोने करु, ही दुर्दम्य इच्छाशक्तीही त्यांच्या प्रत्येक पावलात दिसते. आत्मनिर्भर होऊ पाहणार्या नव्या पिढीच्या आयकॉन म्हणून चित्रलेखा पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
इच्छाशक्ती, आत्मभान, आत्मविश्वास या माध्यमातून कोणतेही क्षेत्र महिलांसाठी अस्पृश्य नाही, हे चित्रलेखा पाटील यांनी दाखवून दिले आहे. नेतृत्वगुण, प्रशासकीय कौशल्य आणि प्रत्येक पातळीवर धडपड करण्याची तयारी यातून त्यांनी नव्या पिढीसमोर एक आदर्श घालून दिला आहे. वृत्तपत्रासारखे विस्तीर्ण क्षेत्र असो की शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून येणारे जबाबदारीचे ओझे, या प्रत्येक ठिकाणचा त्यांचा वावर हा त्यांच्यातील वेगळेपण दाखवून देतो. आपल्या भागातील मुलांना चांगल्यात चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या प्रगतीतील अडसर दूर व्हावा, यासाठी पीएनपी एज्युकेशनच्या माध्यमातून उभारलेले शैक्षणिक संस्थांचे जाळे… भांडवलदारी मानसिकतेवर प्रहार करीत सामान्य कामकरी, शेतकर्यांचा आवाज बुलंद करणारे कृषीवल परिसराच्या विकासाला अप्रत्यक्षरित्या हातभार लावतात. लोकांचे हक्क मिळवून देतानाच त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचा विडाच चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वात उचलला गेलाय.
भाई जयंत पाटील यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या संस्था स्वयंपूर्ण झाल्या आहेत. भाईंची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारे अनेक घटक आपापली जबाबदारी उचलत असतात. परंतु, या सगळ्या घटकांचे नेतृत्व करुन त्यांना एका दिशेने नेण्याची किमया चित्रलेखा पाटील यांनी साधली आहे. त्यामुळेच शिक्षण, माध्यमे, सामाजिक उपक्रम आणि आता राजकारण या आघाड्यांवर त्यांची वेगळी दखल घ्यावीच लागते. आत्मविश्वास, नेतृत्वगुण ओतप्रोत असलेल्या व्यक्तिमत्वाच्या धनी चित्रलेखा पाटील आहेत.
भविष्यात त्या हाती घेतलेली सर्व कामे याच निष्ठेने आणि ताकदीने पूर्ण करतील, असा दृढ विश्वास आमच्या मनात आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
- अमोल नाईक
जनसंपर्क अधिकारी, पीएनपी एज्युकेशन सोसायटी अलिबाग