Skip to content

कृषीवलचा समृद्ध वारसा

::::

“पत्रकारिता ही लोकशाही टिकवून ठेवते. प्रगतीशील सामाजिक बदलासाठी ही मोठी शक्ती आहे”

– अँड्र्यू वॅच्स

दि. ७ जून १९३७ रोजी दिवंगत नारायण नागू पाटील यांनी ‘कृषीवल’ वृत्तपत्राची स्थापना केली. शेतकरी, कामगार आणि वंचित समुदायांवरील अन्यायाचा सामना करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल होते. ब्रिटिश साम्राज्याच्या काळात प्रचलित असलेल्या शोषक खोती प्रथेविरोधात स्व. नारायण नागू पाटील शेतकर्‍यांच्या बरोबरीने आंदोलने आणि संपाच्या माध्यमातून लढा दिला. त्यांच्या या मोहिमेत ‘कृषीवल’ने मोलाची कामगिरी बजावली.

मी या वृत्तपत्राची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत ऑनलाइन आवृत्ती सुरू झाल्यामुळे आमची वाचकसंख्या लक्षणीयरित्या विस्तारली असून, आंतरराष्ट्रीय वाचकांपर्यंत आमची पोहोच वाढवू शकलो. आज कृषीवल हे प्रामाणिकपणे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

‘कृषीवल’च्या माध्यमातून विविध कार्यक्रम सुरू केले असून त्यापैकी एक सर्वात उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे, कृषीवल हळदीकुंकू! अलिबाग, मुरुड, रोहा, पेण, खालापूर, माणगाव आणि नांदेडसारख्या ठिकाणी साजर्‍या होणार्‍या या कार्यक्रमात ५0 हजारांहून अधिक महिला सहभाग घेतात. याव्यतिरिक्त आम्ही ‘कृषीवल’तर्फे सौंदर्य स्पर्धा, शब्द कोडे स्पर्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणार्‍या स्थानिक लोककला स्पर्धा यांचे आयोजन करतो.

ध्येय :

पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित समुदायांना आधार देण्याचे उद्दिष्ट –

१. राज्यातील महत्त्वाकांक्षी पत्रकारांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
२. वंचित समुदायांना आधार देणे, निर्भय पत्रकारितेचा प्रसार करणे आणि महत्त्वाकांक्षी पत्रकारांना संधी देणे.
३. पत्रकारिता व संबंधित विषयांसाठी नवनवीन अभ्यासक्रम सुरु करणे.
४. पत्रकारांना आणि पत्रकारितेला विविध शासकीय अनुदान मिळण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणे.