Skip to content

शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय पटलावरचं सक्षम नेतृत्व

पीएनपी एज्युकेशनच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करुन खेड्यापाड्यातील मुलांना पुणे-मुंबईच्या धर्तीवर शिक्षण दिले. पीएनपी नाट्यगृहाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले. राजकीय क्षेत्रातही एक वेगळा दबदबा निर्माण केला. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय पटलावरचं सक्षम नेतृत्व निर्माण करुन ठेवले आहे.

सन २००१ साली लावलेले प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचे इवलेसे रोप अलिबागच्या लाल मातीमध्ये रुजले, अंकुरले आणि आता त्याच्या यशस्वी कारकीर्दीचा बहर इतका ओसंडून वाहात आहे, की जेवढी फुले वेचावी तेवढा त्याचा बहर आणखीनच बहरत जातो. खेड्यातील आणि तळागाळातील गरीब आणि गरजू विद्यार्थी शिकला पाहिजे, ही स्व. प्रभाकर पाटील ऊर्फ भाऊंची तळमळ लक्षात घेऊन आमदार भाई जयंत पाटील यांनी भाऊंचे स्वप्न या संस्थेची स्थापना करुन साकार केले. भाऊंची शिकवण, भाई आणि फुलगावकर सरांचे परिश्रम यामुळे ही शिक्षण संस्था आकाराला येऊ लागली. २००८ साली भाईंचे सुपुत्र नृपाल पाटील यांचा विवाह चित्रलेखाताई यांच्याशी झाला. विवाहानंतर सौ. चित्रलेखा पाटील यांनी सर्वच जबाबदार्‍या आपल्या खांद्यावर घेत सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जणू एका क्रांतीपर्वास सुरुवात केली, असेच म्हणता येईल. २००९ पासून चित्रलेखा पाटील यांनी प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचा कारभार आपल्या हातात घेतला असून, आज त्या संस्थेच्या कार्यवाहपदाची धुरा यशस्वी सांभाळत आहेत. त्याची प्रचिती संस्थेच्या नावलौकिकात सतत होत जाणारी वाढ आणि चढत्या आलेखातून दिसते.

शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मास मीडिया क्षेत्रात त्या पदवीधर असल्याने संस्था प्रसिद्धीच्या कार्यात त्यांनी नेहमीच बहुमोल योगदान दिले आहे. हायटेक आणि डिजिटल युगात अनुकूल कार्यवाहकाची झालेली निवड, ही संस्थेच्या विकासातील दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. ज्यावेळी चित्रलेखा पाटील यांनी कार्यवाहपदाचा स्वीकार केला, त्यावेळी शाळा व महाविद्यालयांची अनेक आव्हाने त्यांच्यासमोर उभी होती.

 

आव्हानांना तोंड देऊन पुढील संघर्षमयी आव्हानांचा कष्टमय प्रवास त्यांना करायचा होता. सुरुवातीला त्यांनी काही महिने संस्थेच्या प्रगतीचा इतिहास आणि समस्या जाणून घेतल्या. संस्था प्रसिद्धीसाठी त्यांनी नवनव्या योजना तयार केल्या. या योजना योग्यपणे अंमलात आणण्यासाठी त्यांनी आपल्या कुशल सहकार्यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय त्यांनी टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अलिबाग-वेश्‍वी येथे तर त्यांनी संस्थेचे शिक्षण संकुल उभे केले आहे. ‘केजी टू पीजी’पर्यंत मुलांना एकाच छताखाली शिक्षण मिळावे, असे त्यांनी पाहिलेले भव्य स्वप्न नुसते स्वप्न न राहता, सत्यात उतरविण्याचे काम केले आहे. येथेच त्यांची मुलांच्या शिक्षणाबाबतची तळमळ प्रकर्षाने जाणवते. सुसज्ज इमारती, प्रशस्त वर्गखोल्या, प्रयोगशाळा याचबरोबर नवनवे खेळाडू तयार होण्यासाठी भव्य क्रीडांगण अशा दिमाखात प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचे प्रशस्त संकुल उभे आहे. जिल्हा व राज्य शासनाच्या अनेक सेवा परीक्षा याच वास्तूमध्ये घेतल्या जातात. मुंबई विद्यापीठातील कोणतेही अधिकारी हे संकुल पाहून भारावून जातात.

प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आ. भाई जयंत पाटील यांचे ग्रामीण भागांमध्ये दहा गावांना एक इंग्रजी माध्यमाची शाळा अशा प्रकारे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नवीन ५० शाळा उभारण्याचे स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे शिवधनुष्य चित्रलेखा ताई समर्थपणे पेलत आहेत, याचा आम्हाला विश्‍वास आहे. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचणे हा चित्रलेखा पाटील यांचा छंद आहे. अभिनय, नृत्य, कला, संगीत यावर त्या मनस्वीपणे प्रेम करतात. त्यामुळे अशा या विविध क्षेत्रांमध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांची, कलाकारांची त्या नेहमीच अभिमानाने पाठ थोपटतात. संस्था, तालुका, जिल्हा, विद्यापीठ राज्य नव्हे तर, राष्ट्रीय स्तरावर ज्या-ज्या खेळाडूंनी किंवा सांस्कृतिक स्पर्धकांनी पी.एन.पी. शिक्षण संस्थेचा झेंडा अटकेपार फडकविलेला आहे, त्यांचा त्या नेहमीच विशेष सन्मान करतात. त्यामुळेच अशा विद्यार्थ्यांची त्यांना अत्यंत कदर आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्या रमतात. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा अनेक सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून त्या सर्व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतात. विद्यार्थ्यांची अडचण ही आपली अडचण समजून त्यावर स्वत: लक्ष घालून मात करतात. केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे तर, पी.एन.पी. शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारीवर्ग त्यांना प्रिय आहे. माझी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम पदवी आणि एम.बी.ए. डिग्री पूर्ण करण्याचे माझे स्वप्न त्यांच्या मार्गदर्शनामुळे पूर्ण करता आले. हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.

युग बदलत आहे, काळ बदलत आहे. या बदलत्या काळाप्रमाणे आपणही ‘अप टू डेट’ राहिले पाहिजे, हा चित्रलेखा पाटील यांचा नियम आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच, पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा, शेतकरी कामगार पक्षाच्या युवा महिला नेतृत्व म्हणून त्या काम पाहात आहेत.

‘चित्रलेखा पाटील’ हे नाव रायगड जिल्ह्यात घराघरात पोहोचले आहे. त्या सर्वांमध्ये ‘चिऊताई’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रभाकर पाटील शिक्षण संस्था आता नावारुपाला आली आहे. भविष्यात ही संस्था क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखली जाईल, यासाठी चित्रलेखा पाटील आणि आम्ही सर्व त्यांची टीम कटिबद्ध आहोत, हे निश्‍चितच! पुढील वाटचालीत महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी अलिबागचे नेतृत्व करावे, ही मनस्वी इच्छा आहे.

अमोल नाईक

जनसंपर्क अधिकारी, पीएनपी एज्युकेशन सोसायटी अलिबाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *