Skip to content

रायगडमधील सांस्कृतिक वारशाचे पाईक आणि कलेशी बांधिलकी

::::

“भारतातील भव्य संस्कृती आणि कलांच्या दर्शनासाठी निश्चितपणे मोठ्या व्यासपीठाची आवश्यकता आहे”

– सद्गुरु

समाजाची ओळख घडवण्यात कला आणि संस्कृतीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या क्षेत्रातील भारताची समृद्धता जगभरात सुप्रसिद्ध आहे. नाटका, संगीत, नृत्य, चित्रपट,अनेक लोककला यांनी  भारतीय संस्कृतीला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.

अलिबागमधील पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाची अध्यक्ष म्हणून भाई जयंत पाटील यांनी मला दिलेल्या संधीच्या माध्यमातून मी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याचा प्रयत्न करत आहे.

या भूमिकेतून माझे सर्वांत मोठे यश म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील अपूर्ण राहिलेले सांस्कृतिक नाट्यगृह पूर्ण करणे. हे नाट्यगृह आज रायगड जिल्ह्यातील संस्कृतीचे दीपस्तंभ म्हणून उभे आहे. अत्याधुनिक सुविधांनी समृद्ध, ८०० जणांची आसन क्षमता असलेली हे संपूर्ण वातानुकूलित वास्तू सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कलात्मक अभिव्यक्तीचा केंद्रबिंदू बनली आहे. प्रसिद्ध नाटके, ऑर्केस्ट्रा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देऊन आम्ही पूर्वी मनोरंजनासाठी दूरवर जावे लागणाऱ्या स्थानिक रहिवाशांची कलेची तहान यशस्वीपणे शमवली आहे.

त्याचप्रमाणे आधुनिक कलेला वाव देण्यासाठी आम्ही या नाट्यगृहात Tiktok व्हिडीयो स्पर्धा, youtube व्हिडीयो स्पर्धा याचबरोबर पारंपारिक भजन स्पर्धा यांचे आयोजन केले होते. अलिबाग, मुरुड आणि रोहा येथील कलाकारांना हे नाट्यगृह सरावासाठी मोफत दिलेले आहे. त्याचप्रमाणे नव्याने भरारी घेणाऱ्या, उदयन्मुख कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी, स्टेज शो करण्यासाठी हे नाट्यगृह अनेक वेळा मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

हा प्रवास एवढ्यावरच थांबत नाही, तर मॉरिशसमधील प्रतिष्ठित गायन आणि नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण संघाचा प्रवास खर्च करण्यासह विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मी अनेक उदयोन्मुख प्रतिभावंतांना आर्थिक सहाय्य केले आहे. तिथली त्यांची कामगिरी केवळ विजयच नव्हे, तर प्रथम स्थान मिळवणारी होती, याचा अभिमान वाटतो.

काही वर्षांपूर्वीच अकस्मात लागलेल्या आगीमुळे या सभागृहाचे भयंकर नुकसान झाले. यामुळे कलावंत व कलाप्रेमी निराश झाले. मात्र, आमचा संकल्प अढळ आहे. आम्ही या महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्राच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आहे आणि पुढील काही महिन्यांतच सुधारित सभागृह पुन्हा सुरू करण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर आम्ही ठाम आहोत.

भविष्यात कलेसाठी समर्पित कार्य करण्याचे आमचे मोठे ध्येय आहे.

ध्येय :

कलात्मक अभिव्यक्ती उन्नत करणे

  1. सर्जनशील अभिव्यक्ती व कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ प्रदान करण्यासाठी सार्वत्रिकप्रयत्न करणे आवश्यक आहे.प्रत्येक कलाकाराला त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी आणि ती रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी हक्काची जागा हवी आहे. असे व्यासपीठ तयार करून, केवळ प्रस्थापित कलाकारांनाच नव्हे तर कलेच्या विशाल जगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींनाही सशक्त बनविण्याचे आमचे ध्येय आहे.
  2. नवोदित प्रतिभावंतांनासर्वतोपरी सहाय्यप्रदान करणे आवश्यक आहे. अनेक महत्त्वाकांक्षी कलाकारांना विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागते, ज्यात संसाधने आणि मार्गदर्शनाचा अभाव ते त्यांच्या सर्जनशील कार्यातील सर्वांत मोठी समस्या असते. हे आवश्यक मार्गदर्शन आणि समर्थन पुरवून त्यांना या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करू शकतील, त्यांना प्रोत्साहन देतील , असे वातावरण तयार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
  3. अलिबाग, मुरुड आणि रोहा येथीलसमृद्ध कलात्मक प्रतिभा राष्ट्रीय स्तरावर नेण्याचाआमचा मानस आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून आम्ही या क्षेत्रांतील प्रतिभा अधोरेखित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. हे उपक्रम केवळ स्थानिक कलाकारांनाच उन्नत करत नाहीत तर राष्ट्रीय कलात्मक भूदृश्य समृद्ध करून एक आंतरसांस्कृतिक संवाद देखील निर्माण करतात.

४. कलाकारांना विविध अनुदान मिळण्यासाठी, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळण्य साठी विधानसभेत आवाज उठविणे.

५. कलेला वाव देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे.

आमचे ध्येय कलात्मक अभिव्यक्तीला ओळखणे, महत्त्वाकांक्षी प्रतिभांना सर्वतोपरी पाठिंबा देणे आणि प्रादेशिक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर नेणारी चळवळ उत्प्रेरित करणे आहे. या प्रयत्नांद्वारे, आम्ही नवनिर्मितीला प्रेरणा देणारा आणि विविधतेचा उत्सव साजरा करणारा समृद्ध कलासक्त समुदाय विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.