Skip to content

रायगडच्या रणरागिणी, अलिबागची शान, खेड्यापाड्यातील लोकांची आधारशिला, माता, भगिनी, शेकाप महिला आघाडीप्रमुख, अलिबाग नगरपरिषदच्या माजी नगरसेविका, पी.एन.पी. एज्युकेशनच्या कार्यवाह, तसेच तीक्ष्ण नजरेने व आपल्या मधुर वाणीने लोकांची दुःख, समस्या समजून घेणाऱ्या व त्यांच्या मनामनात लाल गुलाल उधळून आशेचा किरण बनू पाहणाऱ्या कार्यतत्पर अशा आमच्या सौ.

चित्रलेखाताई पाटील उर्फ चिऊताई!

माझी ताईंसोबत पहिली ओळख झाली ती म्हणजे पी.एन.पी. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्व. श्री फुलगावकर सर यांच्यासमवेत. ज्यावेळी 2008 साली सरांनी माझी भेट चित्रलेखाताई पाटील यांच्या सोबत करून दिली होती. यासंदर्भात भेट घेण्यासाठी सर स्वतः मला ताईंना भेटण्यासाठी कृषीवलला गेले होते व त्यावेळी ताईंचे नुकतेच लग्न झाले होते. त्यावेळी ताईंशी जेव्हा प्रथम क्षणी बोलले, त्या क्षणी आले वाटले की आमदार जयंतभाईंनी संस्थेच्या सचिवपदाची धुरा सांभाळण्यासाठी योग्य अशाच व्यक्तीची निवड केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना जे मी अनुभवले आहे, ते शब्दात सांगणे म्हणजे लहानशा घागरीत समुद्र भरण्यासारखे आहे.

‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच; असे यथार्थ उदाहरण म्हणजे सौ. चित्रलेखाताई पाटील. अतिश्रीमंत व्यावसायिक कुटुंबात जन्माला आलेल्या ताईंनी पाटील कुटुंबात उद्योजक होणे किंवा ऐशारामात जीवन जगणे पसंत केले नाही, तर याउलट पाटील परिवारात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात आपले वेगळेपण निर्माण केले आहे. ताई शैक्षणिक क्षेत्रात काम करून खेड्यापाड्यातील मुलांना पुणे- मुंबईच्या धर्तीवर शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. पी.एन.पी. संस्थेला सिंबायोसिस किंवा नरसी मोनजी यांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांप्रमाणे मोठ्या उंचीवर नेण्याचा त्यांचा मानस आहे. आणि, नक्कीच ताई हे स्वप्न पूर्ण करतील, यात काही शंका नाही.

 

‌‘सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे; या उपक्रमांतर्गत ताईंनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या गरीब, गरजू मुलींना किमान एक लाख सायकल वाटपाचा संकल्प केला आहे आतापर्यंत जवळजवळ 25 हजारहून अधिक सायकलींचे वाटप करून त्यांच्या जीवनातील शैक्षणिक अंधकार दूर केला. पी.एन.पी. संस्थेतील विविध शाखांमधील कर्मचारी अपडेट असण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी त्या शिबिरे, चर्चासत्र, प्रशिक्षणे, विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने यांचे आयोजन करीत असतात.

त्यांचे व्यक्तिमत्त्वच मुळी विशाल आहे. प्रत्येक कार्याप्रती त्यांची निष्ठा थक्क करून सोडणारी आहे. त्या नेहमीच राजकारणाला वेगळ्या दृष्टीकोनातून वाहू पाहताहेत. संपूर्ण रायगडमध्ये त्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कोणत्याही समर्थकाची जात-पात न पाहता नेहमी त्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. साहित्य, शिक्षण, उद्योग, राजकारण, समाजकारण या सर्व माध्यमातून ताईंची एक विशिष्ट भूमिका दिसून येते. सर्वसामान्य जनतेशी नाळ राखायची, त्यांच्या दु:ख-वेदनांवर फुंकर मारायची, त्यांना न्याय मिळवून द्यायचा, ही भूमिका ताईंसारख्या सुसंस्कृत नेत्याच घेऊ शकतात. समाजात वावरत असताना तरुण पिढीला, विद्यार्थीवर्गाला एवढेच काय, सर्वांसाठी ताई एक प्रेरणास्थान आहेत.

 

ताईंबद्दल मला जास्त आदर वाटण्याचे एक कारण म्हणजे, त्यांच्या कामाची पद्धत. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांना न्याय देणाऱ्या प्रगल्भ विचारांच्या नेत्या म्हणजे ताई! शेवटी म्हणावेसे वाटते –

दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती…